जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच तीन दिवसांचे ‘भागवतपुराण’! – रत्नाकर महाजन

जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच तीन दिवसांचे ‘भागवतपुराण’! – रत्नाकर महाजन

मुंबई – सदैव प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले तीन दिवस दिल्लीत केलेली भाषणे म्हणजे परस्पर विसंगत विधाने, संघाच्याच इतिहासाशी बेईमानी आणि लोकांच्या मनात सतत संभ्रम निर्माण करण्याच्या सवयीचे उत्तम उदाहरण आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. महाजन म्हणाले की, स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसचे योगदान मोठे आहे आणि या पक्षाने देशाला अनेक थोर नेते दिले. असे शहाजोगपणे प्रशस्तीपत्रक देणा-या मोहन भागवतांना हे माहित पाहिजे की, ते आता जे बोलत आहेत ते जगाला जवळपास पाच दशकांपेक्षा जास्त काळापासून माहित आहे. यासंबंधात मोहन भागवतांनाच असा प्रश्न विचारला पाहिजे की, काँग्रेसच्या योगदानाचे राहू द्या उलट तुम्ही ज्या संघटनेचे सध्या प्रमुख आहात त्या संघटनेचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान काय? हेडगेवारांचे व्यक्तिगत उदाहरण सोडले तर गोळवलकरांपासून सर्व संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची टिंगल टवाळी व विरोध करण्यातच धन्यता मानली, हा इतिहास सर्वांना माहित आहे.

संघ हे लोकशाही प्रधान संघटन आहे असे एक विनोदी विधान मोहन भागवतांनी केले. संघाचा लोकशाहीवर एवढा दृढ विश्वास असेल तर संघाच्या कार्यप्रणालीचे एकचालकानुवर्तित्व हे वैशिष्ट्य कसे समजून घेणार? या तत्वाचाच प्रचार आजपर्यंत संघ शाखांवर “म्होरक्याचं ऐका याचं, स्वयंसेवकाचं” या गाण्याचे काय करणार? असा सवाल डॉ. महाजन यांनी केला.

संघाच्या दृष्टीने राज्यघटना व तिरंगी झेंडा यांचे महत्त्व मोठे असून त्याबद्दल संघाला अभिमानच आहे असे धादांत खोटे विधान भागवतांनी केले. या दोन्ही विषयी माधव सदाशिव गोळवलकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवरून आपला स्पष्ट विरोध त्यावेळी नोंदवला आहे. १४ ऑगस्ट १९४७ च्या ऑर्गनायजर च्या अंकात तीन हा आकडा अशुभ असून तिरंग्याचा स्वीकार केला तर भारतावर अरिष्ट येईल असे विधान गोळवलकरांनी केले होते. घटनेबद्दलही त्यांना आक्षेप होता. त्यांच्या मते भारतीय संस्कृती व परंपरा यांना साजेशी मनुस्मृती उपलब्ध असताना अशा गोधडीछाप घटनेची काय गरज आहे असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

युक्त-मुक्त असा शब्दछल आणि शाब्दिक कोटी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. त्यांना खरेच असे वाटत असेल तर गेल्या पाच वर्षापासून त्यांनीच पंतप्रधानपदासाठी निवडलेल्या प्रचारकापासून ते गल्लीतल्या स्वयंसेवकांपर्यंत काँग्रेसमुक्त भारत अशी वल्गना करण्यापासून त्यांना कधी अडवले?

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना आपल्या कामगिरीच्या आधारे त्या जिंकता येणार नाहीत अशी खात्री वाटल्याने पुन्हा एकदा राम मंदिराचे भूत त्यांनी उभे केले आहे. हिंदू आणि मुस्लीम हे भारतीयच असल्याने त्यांच्यात भेद करणे संघाला मान्य नाही आणि हिंदू राष्ट्र हे मुस्लिमांशिवाय असूच शकत नाही असे आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करणारे विधान त्यांनी केले आहे. हे जर खरे असेल तर राम मंदिराच्या बरोबरच त्याच जागेवर त्यांच्या अनुयायांनी पाडलेली बाबरी मशीद पुन्हा बांधून देण्याचा शब्द ते देतील काय?  असा सवाल डॉ. महाजन यांनी केला.

केंद्रीय वित्त आयोगाची फजिती कोणाच्या दबावामुळे?

केंद्रीय वित्त आयोग राज्यातील सरकारी व बिगर सरकारी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी नुकताच राज्यात आला होता. या बैठकीपूर्वी केंद्रीय वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे विदारक चित्र जाहीर पत्रक काढून उभे केले होते. मात्र केवळ चार दिवसात या वित्त आयोगाने कोलांटीउडी मारून राज्याच्या आर्थिक स्थितीचे कौतुक करून टाकले. यापैकी वित्त आयोगाचे खरे मत कोणते समजायचे? आपण दिलेल्या आकडेवारीची जबाबदारी वित्त आयोगाने राज्याच्या महालेखापालांवर टाकली असून त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्या आधारे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे पत्र प्रसिध्द केल्याचे अजब स्पष्टीकरण देऊन वित्त आयोगाने विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. केंद्र आणि राज्य पातळीवरील भाजपच्या ‘सुशासनाचा’ दावा फोल ठरवणारा हा गोंधळ कुणाच्या दबावामुळे झाला हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे असे डॉ. महाजन म्हणाले.

COMMENTS