गोवा मंत्रिमंडळात फेरबदल, दोन मंत्र्यांनी घेतली शपथ !

गोवा मंत्रिमंडळात फेरबदल, दोन मंत्र्यांनी घेतली शपथ !

पणजी – गोवा मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडूरंग मडकईकर यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी आज कुडचडेचे आमदार निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे. नाईक यांनी मराठीतून तर काब्राल यांनी कोकणी भाषेतून गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे या शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित नव्हते. याशिवाय सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणी ज्येष्ठ मंत्रीही मंचावर नसल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपने आजारी मंत्र्यांना वगळावे असा सूर पक्षातीलच आमदार व्यक्त करत होते. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजपचे पाच, गोवा फॉरवर्डचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आणि दोन अपक्ष असे एकूण 12 मंत्री आहेत. विधानसभेची सदस्यसंख्या 40 असल्याने जास्तीत जास्त 12 जणांचेच मंत्रिमंडळ असू शकते.

दरम्यान या शपथविधी सोहळ्याला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, क्रीडामंत्री बाबू आजगावकर,  नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, महसूलमंत्री रोहन खंवटे, पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, प्रदेश भाजप अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार दीपक पावसकर, एलिना साल्ढाणा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामोदर नाईक, भाजप उपाध्यक्ष अनिल होबळे, निरीक्षक बी. एल. संतोष, विजय पुराणिक आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

COMMENTS