जलयुक्त शिवार योजनेत कसा झाला घोटाळा ? सचिन सावंतांनी उलगडून सांगितला !

जलयुक्त शिवार योजनेत कसा झाला घोटाळा ? सचिन सावंतांनी उलगडून सांगितला !

मुंबई – काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावत यांनी पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजनेवर सरकारवर जोरदार टीका केली आहे. जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे फसली असून या योजनेवर खर्च झालेल्या 7789 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. भुजल सर्व्हेक्षणाचा अहवालामुळे जलयुक्त शिवार योजनेचा फोलपणा आणि घोटाळा उघड करत आहे. भुजल सर्व्हेक्षणाचा अहवालानुसार 2014 साली राज्यात 70.2 टक्के पाऊस पडला होता, तेव्हा 194 तालुक्यातील 5976 गावातील पाण्याची पातळी 1 मीटरपेक्षा कमी झाली होती. 2018 साली म्हणजेच यंदा राज्यात 74.3 टक्के पाऊस पडला आहे. यावेळी 252 तालुक्यातील 13984 गावातील पाण्याची पातळी 1 मीटरपेक्षा जास्तने खालावली आहे. 2014 साली जलयुक्त शिवार योजना नव्हती आणि तेव्हा पाऊसही यावर्षीपेक्षा कमी झाला होता, तरीही पाण्याची पातळी घटलेल्या गावांची संख्या 5976 होती तर यंदा 2014 पेक्षा जास्त पाऊस पडून आणि मागील तीन वर्ष जलयुक्त शिवार योजना राबवूनही यंदा भुजल पातळी 1 मीटरपेक्षा जास्तने घटलेल्या गावांची संख्या तब्बल 13984 आहे.

याचाच अर्थ जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे फसली असून या योजनेवर खर्च झालेल्या 7789 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. जलयुक्त शिवार ही योजना राज्याच्या हितासाठी कशी लागू झाली आहे, याची जाहीरात आणि गाजावाजा सरकारने केला. मी मागील आठवड्यात भुजल सर्व्हेक्षणाचा अहवाल समोर आणला. या अहवालामुळे जलयुक्तचा फोलपणा समोर आला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर 7789 कोटी रुपये खर्च केले गेले मात्र हा पैसा गेला कुठे असा सावलही सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच या खात्याचे मंत्री म्हणतात 700 कोटी रुपये लोकसहभागतून खर्च झाले. मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांनी शेतकऱ्यांचा अपमान केलाय. मात्र जलयुक्तमधील केवळ 10 टक्के कामं लोकसहभागातून झाली आहेत. जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा लपवण्यासाठी सरकार गरीब शेतकर्‍यांना पुढे करतंय. पाऊस कमी पडला आणि शेतकऱ्यांनी पाण्याच्या जास्त उपसा केला असं सरकार म्हणतंय, हा शेतकर्‍यांचा अपमान आहे. घोटाळा लपवण्यासाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरलं जातंय. खरीपाची पिकं वाळत चालली आहेत, जर शेतकर्‍यांनी उपसा केला तर पिकं अडचणीत का आली? असा सवालही यावेळी सचिन सावंत यांनी केला आहे.

COMMENTS