लाच देऊन मते विकत घेणे ही भाजपची दानव संस्कृती – सचिन सावंत

लाच देऊन मते विकत घेणे ही भाजपची दानव संस्कृती – सचिन सावंत

मुंबई – “तुम्ही मला विजयी करा, मी तुम्हाला पैसे देईन.” हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान मतदारांना दिलेले आर्थिक प्रलोभन आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो पण भाजप मतदारांना विकाऊ समजत आहे. यापूर्वीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरा असे भाजप कार्यकर्त्यांना जाहीर सभेतून सांगितले होते. त्यामुळे लाच देऊन मते विकत घेणे ही भाजपची दानव संस्कृती आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मतदान मागण्यासाठी कोणतेही ठोस काम नाही. त्यामुळे देश आणि धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातही राहिलेली कसर धनशक्तींच्या माध्यमातून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेतून लोकांना मतदानासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले आहे. हा प्रकार स्पष्टपणे गंभीर गुन्हा आहे असे सावंत म्हणाले.

यापूर्वीही दानवे यांनी पैठण येथे लक्ष्मी घरात येत असल्यास तीचा स्वीकार करा असे सांगून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पुन्हा केलेले विधान त्यांच्या पुढील काळातील कारवायांचे सूतोवाच करणारे आहे. याच सभेमध्ये दानवे यांनी विरोधी पक्षांबद्दल अशोभनीय शब्दांचा वापर केला. जे दानवे शेतक-यांना साले म्हणू शकतात ते विरोधी पक्षांबद्दल चांगले शब्द वापरण्याचे अपेक्षित नव्हते. मात्र त्यांनी वापरलेले आक्षेपार्ह शब्द पाहता त्यातून दानवेचींच विकृत मानसिकता आणि दानव संस्कृती चव्हाट्यावर आली आहे असे सावंत म्हणाले.

COMMENTS