पवार साहेबांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळलीय का ? – सदाभाऊ खोत

पवार साहेबांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळलीय का ? – सदाभाऊ खोत

सातारा: पवार साहेबांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही. ते कधी हिंद केसरी झाले होते का, ही माहिती मी जुन्या लोकांकडून घेतली तर त्यांनीही नाही म्हणून सांगितले. लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळले असतील ते सोडा. पण तरीही ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले ना,’ असा चिमटा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना काढला.

शेतकरी आंदोलनाविषयी अमेरिकी पॉपस्टार रिहाना हिनं केलेल्या एका ट्वीटला सचिन तेंडुलकरसह काही सेलिब्रिटींनी दिलेल्या उत्तरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर मत मांडलं होतं. इतर क्षेत्रांबद्दल व्यक्त होताना काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी सेलिब्रिटींना दिला होता. पवारांच्या या वक्तव्याचा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

त्याबाबत विचारलं असता सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. ‘पवार साहेबांनी सचिनच्या वक्तव्यावर मांडलेले मत ऐकून मला हसू आले. सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण पवार साहेब स्वत: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला

COMMENTS