सांगलीतल्या स्वर्गीय वसंतदादा घराण्याच्या बंडामागे भाजप आणि चंद्रकांतदादांचा सहभाग ?

सांगलीतल्या स्वर्गीय वसंतदादा घराण्याच्या बंडामागे भाजप आणि चंद्रकांतदादांचा सहभाग ?

सांगली – सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या हालचाली दिसल्यानंतर सांगलीत उमेदवारी आणि जागा सोडण्याबाबतचा सुरू झालेला तमाशा अजूनही थांबलेला नाही.या वावटळीत काँग्रेसमधील कार्यकर्ते अजूनही सांगली लोकसभेची जागा आपल्या पदरात पडेल या आशेवर थांबलेले आहेत. त्यासाठी दिल्ली, मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांसह सर्वच पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच वसंतदादा पाटील घराण्यातील प्रतिक पाटील काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र या चर्चेला पूर्णविराम देत प्रतिक पाटील यांनी आम्ही काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी बोलताना प्रतिक पाटील म्हणाले की, भाजपात जाण्याची कोणतीही हालचाल नाही, आमचे संबंध सगळय़ा पक्षातील नेत्यांशी चांगले आहेत. वसंतदादांचा वारसा असल्याने काँग्रेस सोडण्याची शक्यता नाहीे असे त्यांनी सांगितले. आणि दोन दिवसांतच काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

दुसरीकडे सांगली लोकसभा लढणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे दुसरे नातू विशाल पाटील यांनी तातडीने वसंतदादा पाटील प्रेमींचा मेळावा घेत जागा सोडली तर काँग्रेसच्या पंजावर नाहीतर अपक्ष लोकसभा लढण्याची घोषणा केली. या सर्व घटनामागे नेमकेे कोण आहे? मात्र मोदींना पराभूत करण्याची उर्मी घेऊन लढणाऱ्या स्वाभिमानीची यामध्ये निष्कारण फरफट होत चालली असल्याचे चित्र आहे.वसंतदादाच्या वारसदारांना कोणीतरी आमिषे दाखवून खेळवत असल्याचा संशय आहे. या सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास केला तर वसंतदादा घराण्याच्या बंडामागे भाजप विशेषतः चंद्रकांतदादा यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होतोय. यांमागे अनेक डावपेच असल्याचे दिसून येते आहे.

१) विशाल पाटील आधी काँग्रेसच्या चिन्हावर लढायला तयार नव्हते मात्र ही जागा स्वाभिमानीला सोडल्याची चर्चा सुरू झाली आणि विशाल उमेदवारीसाठी हट्ट करून बसले.मोठ्या मनाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा वसंतदादा घराण्यातील उमेदवार देण्याचे औदार्य दाखवले मात्र विशाल, प्रतीक आणि श्रीमती जयश्री पाटील या तिघांनीही स्वाभिमानीच्या चिन्हावर ही जागा लढण्यास नकार दिला.

2) विशाल पाटील यांनी काँग्रेसवर दबाव निर्माण करून ही जागा स्वाभिमानीला मिळू द्यायची नाही, म्हणजे स्वाभिमानी आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वाढेल.

3)त्यातून ही जागा स्वाभिमानीला दिलीच तर वसंतदादा घराण्याच्या वारसदाराकडून ही जागा हिसकावून घेतल्याचे चित्र निर्माण करायचे आणि सहानुभूतीची लाट निर्माण करून विशाल पाटील यांना अपक्ष लढायला लावून भाजपमधील असंतुष्ट लोकांना मदत करायला लावायची आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा.

3)विद्यमान खासदार संजय काका आणि चंद्रकांतदादा यांच्यामध्ये वितुष्ट आहे.जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि इतर भाजप पदाधिकारी यांचे जमत नाही. या सर्व घडामोडीतुन विजय मिळालाच तर भाजप खासदार विजयी होतोय. आणि संजय काका पाटील पडलेच तर अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले पाहिजेत अशी खेळी करायची आणि त्यानंतर त्यांना भाजपचे सहयोगी सदस्य बनवायचे आणि वसंत दादा पाटील घराण्याला जिवंत केल्याचे श्रेय घायचे असा खेळ सुरू आहे.

4) यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खच्चीकरण करायचे. त्याचा वाईट परिणाम हातकणंगले लोकसभा मतदारसंघात साधून युतीच्या उमेदवाराला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा.

या सर्व घडामोडी सुरू असल्याचा वास खासदार राजू शेट्टी यांना आल्यानेच त्यांनी काँग्रेसला शेवटचा इशारा दिला आहे. संजय काकांचा काटा विशाल पाटील या काट्याने काढायचा .यामध्ये गमावण्यासारखे काहीच नसल्याने हा खेळ सुरू असल्याने याला जिल्ह्यातील भाजपमधील लोकांनीही सहमती दिली आहे. दुसरीकडे वसंतदादाच्या घरान्याला त्रास दिला म्हणून स्वाभिमनीचे नैतिक अवमूल्यन करायचे. असा दुहेरी, तिहेरी डाव खेळला जातोय.

COMMENTS