मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही!’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही!’

मुंबई – नाराज असलेले शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या भेटीनंतर शिंदे म्हणाले, खासदार संजय जाधव यांची कोणतीही नाराजी नाही. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघातील जी कामं होती ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी नाही. संजय जाधव यांनी कोणतीही नाराजी दर्शवलेली नाही. संजय जाधव यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांनाही सांगितले असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार खासदार आहेत त्याप्रमाणे कामाचं सूत्र ठरलेलं आहे. संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही त्यामुळे मागे घेण्याचा विषयच नसल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल राजीनाम्याचं पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. यामध्ये त्यांनी फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही.या समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले.

मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले होते. त्यामुळे राजीनामा त्यांनी राजीनामा दिला होता.

COMMENTS