दोन नेत्यांच्या गळाभेटीवर चर्चेला उधाण

दोन नेत्यांच्या गळाभेटीवर चर्चेला उधाण

मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या कन्या पूर्वशी व ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांचे पुत्र मल्हार हे लवकरच विवाहबद्ध होत असून रविवारी या दोघांचा साखरपुडा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्यात पार पडला. या सोहळ्यात दोन प्रमुख नेत्यांमध्ये झालेली बैठक सध्या चर्चेचा विषय ठरली. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देताना गळाभेटीत काय गैर आहे?, असा सवाल करतानाच ही काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी तीरकस प्रतिक्रिया दिली.

पूर्वशी-मल्हार यांच्या साखरपुड्याला राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार सपत्नीक या सोहळ्याला हजर राहिले. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनीही या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. फडणवीस यांनी पूर्वशी व मल्हार यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. कॅमेऱ्याने हा नेमका क्षण टिपला आणि त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

संजय राऊत यांना माध्यमांनी फडणवीस यांच्या गळाभेटीबाबत विचारले असता त्यांनी या गळाभेटीवर नेमकं भाष्य केलं. फडणवीस आणि माझ्या गळाभेटीत काय गैर आहे?, असा सवाल करतानाच ही काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी तीरकस प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. महाराष्ट्रात अशाप्रकारे कुणी कुणाची गळाभेट घेत नाही का? अशाप्रकारे विचारधारा, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या घरी समारंभासाठी जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. हीच परंपरा आम्ही जपत आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावेळीही तुम्ही सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहिले आहे. त्यामुळे या गळाभेटीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही, असे राऊत पुढे म्हणाले.

COMMENTS