खा. संजय राऊत काढणार आणखी एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर चित्रपट !

खा. संजय राऊत काढणार आणखी एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर चित्रपट !

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आणखी एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर चित्रपट काढणार आहेत. याबाबत त्यांनी घोषणा केली असून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपद भुषवणारे आणि भारतीय राजकारणात कामगार नेते म्हणून ओळखले जाणार जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच आणखी संजय राऊत हे आणखी एका राजकीय व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणार आहेत.

दरम्यान अद्याप चित्रपटाचं नाव काय असेल हे स्पष्ट झालं नाही परंतु ‘बंद’ हे नाव त्यांच्या चित्रपटासाठी योग्य वाटतंय, कारण मुंबईला ‘बंद’ या शब्दाची ओळख त्यांनीच करुन दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील चित्रपटाची संहिता माझ्याकडे तयार असून बाळासाहेबांवरील चित्रपटाचं काम पूर्ण झालं की लगेचच फर्नांडिस यांच्यावरील चित्रपटाच्या कामाला सुरूवात करणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.लोकांना आता फर्नांडिस यांच्या कामाचा विसर पडला असेल पण कोकण रेल्वेचं स्वप्न सत्यात उतरवण्यात जॉर्ज फर्नांडिस यांचाच सर्वात मोठा हात होता, असं राऊत म्हणाले.

तसेच बाळासाहेबांनंतर माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जॉर्ज फर्नांडिस यांचाच असून हा चित्रपट म्हणजे माझ्याकडून त्यांना सन्मानार्थ दिलेली भेट ठरावी अशी आशाही राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच जॉर्ज फर्नांडिस हे बाळासाहेबांवर प्रखर टीका करणारे नेते म्हणूनही ओळखले जायचे. बाळासाहेब आणि फर्नांडिस हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते हे मान्य आहे.परंतु पडद्यामागे ते दोघंही एकमेकांचा खूप आदर करत असत . २००५ साली वाजपेयी आणि शरद पवारांसारख्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केवळ फर्नांडिस यांनीच बाळासाहेबांचा उल्लेख बाळ असा केला होता असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे बाळासाहेबांच्या चित्रपटानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या आणि राजकीय मंडळींच्या भेटीला येणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS