राष्ट्रवादीला चूक उमगली, संजय खोडकेंची घरवापसी !

राष्ट्रवादीला चूक उमगली, संजय खोडकेंची घरवापसी !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसची काल महत्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विविध विषयांसोबतच आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विदर्भातील काँग्रसचे नेते संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय खोडके हे अमरावतीमधील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निवडीवरुन संजय खोडके यांचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत मतभेद झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्याला खोडके यांचा विरोध होता. त्यांचा विरोध न जुमानता राष्ट्रवादीने राणा यांना तिकीट दिले. त्याचा निषेध म्हणून संजय खोडके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.

लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांनी संजय खोडके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमरावती महापालिका निवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळवलं होतं. आमदार रवी राणा यांची सध्या भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे आता पुन्हा नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. संजय खोडके हे पूर्वीपासूनच शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसमध्येही त्यांचे मन रमत नव्हते. राष्ट्रवादीलाही ती चूक उमगली. आपण एका निष्ठावंत नेत्यावर अन्याय केल्याची जाणीव पक्षाला झाली. त्यातूनच संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरवापसी झाली आहे. त्याचा फायदा पक्षाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार आहे.

COMMENTS