सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकात संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह उल्लेख, सरकारवर जोरदार टीका !

सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकात संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह उल्लेख, सरकारवर जोरदार टीका !

मुंबई – सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केला असून त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे.  संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही जोरदारी टीका केली आहे. सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल करण्यात आलेला उल्लेख अत्यंत आक्षेपार्ह व भावना दुखावणारा आहे. सरकारने हे पुस्तक तातडीने संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल महाराष्ट्राची जाही माफी मागितली पाहिजे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनीही टीका केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या पुस्तकांमध्ये छापला जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का? राज्यातल्या जनतेची तत्काळ माफी मागा आणि वादग्रस्त मजकूर लिहिलेली पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून टाका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

COMMENTS