त्या पार्सलचा निर्णय फडणवीस घेतली – सतेज पाटील यांचा चिमटा

त्या पार्सलचा निर्णय फडणवीस घेतली – सतेज पाटील यांचा चिमटा

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मी परत कोल्हापूरला जाणार आहे, असे म्हणत कोथरूड मतदारसंघाची जनता आणि माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांचा विश्वासघात आणि अपमान केल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला तर पाटील यांचे पार्सल कोल्हापूरला परत पाठवायचे की केंद्रात याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील, असा चिमटा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काढला.

चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात ठेवायचे की दिल्लीला पाठवायचे याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत, असा टोला मारताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘भाजपमध्ये दोन गट आहेत. फडणवीस आणि पाटील गटात वाद सुरू आहे. या वादातूनच त्यांना कुठे पाठवायचे हे ठरणार आहे. मुळात निवडणुका अजून चार वर्षानी होणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरला येतो या विधानास फारसा अर्थ नाही.’

मुश्रीफ म्हणाले, मी परत कोल्हापूरला जातो हे पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या हक्कावर गदा आणत कोथरूडमध्ये घुसखोरी केली. आता परत येणे म्हणजे कुलकर्णी यांच्यासह तेथील मतदार आणि भाजपचाही विश्वासघात आहे. ज्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिले, त्यांचा हा अपमान आहे. कोल्हापूरला परतण्याची त्यांची इच्छा म्हणजे पुढील चार वर्षे ते तेथे काम करणार नाहीत असा होतो. अशावेळी तेथील मतदारांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल करून ते म्हणाले, सत्ता असताना त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते बारा वर्षे विधानपरिषद सदस्य असूनही पदवीधरांचे प्रश्न कायम राहिले. आता कोल्हापुरात येऊन तरी ते काय करणार? ते येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

COMMENTS