पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्यासाठी शरद पवार माढा मतदारसंघात!

पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्यासाठी शरद पवार माढा मतदारसंघात!

सोलापूर – पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज माढा मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. करमाळा व अकलूज याठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. या भेटीत पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्यासाठी पवार हे स्थानिक नेत्यांना एकत्र आणून खलबते करणार आहेत. तसेच भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले  संजय शिंदे हे पवार यांच्या करमाळ्यातील भेटीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान करमाळा येथील बैठकीनंतर पवार हे अकलूज येथे जाणार आहेत. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त साधून अकलूजमध्ये आल्यानंतर पवार हे मोहिते-पाटील आणि माढय़ाचे शिंदे यांच्यातील दरी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. २००९ पासून जिल्ह्य़ात राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेल्या गटबाजीने सध्या टोक गाठले आहे. पक्षात मोहिते-पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांनी स्वत:ची फळी तयार केल्यानंतर ही गटबाजी अधिक फैलावली असताना त्याकडे शरद पवार यांनी नेहमीच काणाडोळा केला आहे. मात्र आता स्वत:च माढय़ातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे ही गटबाजी दूर करण्याकडे त्यांनी लक्ष दिले आहे.

COMMENTS