शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय !

शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय !

मुंबई – शिवसेना आणि भाजपच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक पार पडली आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल काय निर्णय घेतात, त्यानंतर आम्ही भूमिका मांडणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं आहे. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकार सत्तेवर येणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आता राज्यात काय घडामोडी होणार याकडे लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

दरम्यान यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
विधानसभा निकालादिवशीच आपण पत्रकार परिषदेसाठी इथे भेटलो होतो. आज थोड्यावेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केली ते सांगितली. मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना ती करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS