१९८० साली मी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार – शरद पवार

१९८० साली मी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार – शरद पवार

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा पार पडली. यावेळी पवारांनी जयदत्त क्षीरसागर याॆच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी पवारांनी शहर मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्यामागे जनतेची ताकद उभी करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन आज बीड येथील जाहीर सभेत केले. मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले.
असं पवारांनी म्हटलं आहे.

मात्र, असं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथे प्रामाणिकपणाने राहायचं असतं. दुसऱ्या घरोब्याचा शोध केला तर लोक त्याबद्दल काय बोलतात हे न बोललेलंच बरं. बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

१९८० साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल असंही पवार यावेळी म्हणाले आहे.

COMMENTS