लोकसभा, विधानसभेत महिलांना आरक्षण द्या –शरद पवार

लोकसभा, विधानसभेत महिलांना आरक्षण द्या –शरद पवार

नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.आज दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत ते बोलत होते. संविधानाचं काय होणार ही चिंता देशासमोर असून मागील काही महिन्यांपासून देशातील विविध समाजातील छोट्या वर्गावर हल्ले होत आहेत त्या हल्ल्याचे समर्थन केलं जात असून युपीतील उन्नावमध्ये महिलांवर अत्याचार करणारा भाजपचा आमदार होता. त्याला जेलमध्ये पाठवण्याची जबाबदारी सरकारची होती. परंतु याबाबत भाजप सरकारने कडक कारवाई केली नसल्याची जोरदार टीका यावेळी पवार यांनी केली आहे.

दरम्यान पीडित मुलीच्या वडीलांना मारहाण करून त्यांची जेलमध्ये हत्या करण्यात आली. त्याची जबाबदारी युपी-भाजप सरकारवरची असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. तसेच मंदिरात नेऊन मुलीवर अत्याचार केला आणि हत्या करण्यात आली. त्या आरोपींवर कारवाई करण्यास पोलीस गेले तर भाजप आमदारांनी निदर्शने केली. त्याच आमदारांना भाजप सरकारने मंत्री केले आहे. त्यामुळे अधिकाराचा वापर कोणाच्या विरोधात होत आहे हे दिसत असल्याचंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच सत्ता ताब्यात असलेल्या लोकांकडून संविधानावर हल्ला केला जात असून सर्वांचे जीवन धोक्यात आले असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS