राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?,  राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया !

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?, राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज बैठक झाली. या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा होती. मात्र शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.या बैठकीत विलिनीकरणाबाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात विश्लेषणात्मक चर्चा राहुल गांधी यांच्यासोबत झाली असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. राज्यातील दुष्काळासंदर्भातही आम्ही बोललो. मात्र इतर विषयांवर चर्चा झाली नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दुसरा पर्याय सध्याच दिसत नाही त्यामुळे यावेळी राहून गांधी यांनी राजीनामा देणे योग्य नाही असंही आपण राहुल यांना सांगितल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते कसे मिळवता येईल याचीही चाचपणी सध्या सुरु आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपद मिळू शकते अशी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणाबाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS