अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा – शरद पवार

अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर रोजगार आणि करिअर प्रशिक्षण आयोजित करा – शरद पवार

मुंबई – सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी आणि करीयर घडविण्याच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित बैठकीदरम्यान केल्या आहेत.

दरम्यान सामाजिक न्याय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व हक्काचा रोजगार देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह काही सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या दरम्यान काही स्वयंसेवी संस्थानी तयार केलेल्या विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

सामजिक न्याय विभाग अनुसूचित जाती – जमातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण – प्रशिक्षणास लागणारी प्रत्येक मदत करण्यास कटिबद्ध आहेच; परंतु एवढ्यावर न थांबता प्रत्येक विद्यार्थी स्वयंभू व करिअरच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा, बेरोजगारीला आळा घालता यावा यासाठी बार्टी व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात येत आहेत. तीन लाख विद्यार्थ्यांना या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा आमचा माणस आहे, असे या बैठकीनंतर बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले.

एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, एम.बी.ए, बँकिंग, रेल्वे, पोलीस, सैन्य दलातील विविध विभाग यांना अनुसरून विशेष अभ्यासक्रम निश्चित करून प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले जातील. त्याचप्रमाणे उद्योगांच्या निकडीनुसार स्किल अपग्रेडेशन कार्यक्रम हाती घेतला जाणार असुन शेतीविषयक प्रशिक्षणाची योजना आहे. जेणेकरून अनुसूचित जाती – जमातीतील सुशिक्षितांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खात्रीचा रोजगार मिळेल.

याबाबत येत्या ६ तारखेला बार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक घेऊन निर्णय निश्चित केला जाईल, तीन लाख विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण व त्यांना हक्काचा रोजगार देण्याचा आमचा माणस असून हा एक क्रांतिकारी निर्णय ठरेल अशी आशा ही धनंजय मुंडेनी व्यक्त केली.

जपानी भाषेसाठी विशेष प्रशिक्षण

जपान देशात जपानी भाषा येणाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याच विभागातर्फे जपानी भाषा शिकवणारे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरु करुन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात हक्काची नोकरी मिळवुन देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे मुंडे म्हणाले.

COMMENTS