‘त्या’ रात्री फोन करुन वाजपेयींनी माझे कौतुक केले, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा !

‘त्या’ रात्री फोन करुन वाजपेयींनी माझे कौतुक केले, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा !

मुंबई – देशाचे माजी पंतप्रधान, भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९४वी जयंती आहे. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वाजपेयी यांचे निधन झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त पवारांनी जागवलेल्या आठवणी आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासमोर मांडत आहोत.

“मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना “पुलोद’च्या काळात जनता पार्टीच्या रूपाने वाजपेयींचे महाराष्ट्रातील सहकारी आमच्यासोबत होते. त्यावेळी बैठकीनिमित्त मी पहिल्यांदा वाजपेयी यांना भेटलो होतो.” राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याशी सततचा संपर्क होता. 1996 साली वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार पडले. तेव्हा मी कॉंग्रेसचा संसदीय नेता होते. या नात्याने वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मी केलेले भाषण त्यांनी शांततेण ऐकून घेतले. त्यानंतर वाजपेयी यांनी राजीनामा दिला. त्या रात्री त्यांचा मला फोन आला व संसदेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. अशाप्रकारे राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक उमदा माणूस मी पाहिला असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

तसेच वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्यावतीने मी त्यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर गेलो होतो. या दौऱ्यात रोजच्या-रोज ते आमच्याशी चर्चा करायचे. प्रत्येक विषयावर आपल्या देशाची भूमिका काय असावी, हे सांगायचे शिवाय त्यावर आमच्या सूचना असतील तर या सूचनांची तातडीने दखल घ्यायचे, अशी आठवण पवार यांनी सांगितली होती.

गुजरातमध्ये 2002 मध्ये भूकंप आला होता. त्यात मोठी हानी झाली होती. भूकंप झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या पुनर्वसनाचा मला अनुभव होता. मी स्वतः वाजपेयी यांनी गुजरातला याबाबत सहकार्य करण्याची तयारी असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांच्याच सरकारच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचनांचाही ते नेहमी आदर करायचे.

तसेच राजकीय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली.  अशा आठवणी शरद पवार यांनी जागवल्या होत्या.

 

COMMENTS