पंतप्रधानपदासाठी विराट कोहलीचा विचार करावा लागेल –शरद पवार

पंतप्रधानपदासाठी विराट कोहलीचा विचार करावा लागेल –शरद पवार

कोल्हापूर –  पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही पत्रकारांनी सवाल केला. पाकिस्तानमध्ये माजी क्रिकेटर इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी आवडेल का? असं म्हटल्यानंतर शरद पवार यांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं आहे. भारतात या पदासाठी कदाचित विराट कोहलीचा विचार करावा लागेल असं पवारांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत, पाहूया काय होतंय असंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच देशाचा आणि जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष या नात्याने इम्रान खानशी आपले संबंध आले आहेत, मात्र राजकारणी म्हणून मी इम्रान खानला कधीही भेटलो नसल्याचंही यावेळी शरद  पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्याबाबत सोयीस्कर भूमिका घेतात लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी शरद पवारांना घरी बसवा अशी टीका केली होती. मात्र जेव्हा ते पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा पवारांचे बोट धरून मी चालायला शिकलो असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माझ्याबाबतची भूमिका सोयीस्कर आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS