मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही – शरद पवार

मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही – शरद पवार

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलं आहे. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही असं पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय वारकरी परिषदेने हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमाला शरद पवारांना आमंत्रित करु नये, अशी भूमिका घेतली होती. यावर अखंड महाराष्ट्रातील वारकऱ्यांसमोर पवार काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

यावेळी पवार म्हणाले सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी ठेवायची असते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आलो, असं पवार म्हणाले.जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आळंदीत आले होते त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं, पण यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.

COMMENTS