राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही उतरली मैदानात

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनाही उतरली मैदानात

मुंबई : राज्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची पक्ष बांधणी सुरु केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या विदर्भ, खानदेशमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्यानिमित्ताने दौरा करीत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेने आज शिवसंपर्क अभियान सुरु करण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बडी बैठक होती. या बैठकीनंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव पाटील म्हणाले, “राज्यभर शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्याचे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत”.

या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता राज्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनीती या बैठकीत ठरु शकते. दरम्यान, शिवसेनेच्या मोठ्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीतील सर्व आमदारांशीही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. याबाबत पहिली बैठक आज संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे.

COMMENTS