महाविकास आघाडीच्या मंत्र्याकडून शिवसैनिकांना दुय्यम वागणूक

महाविकास आघाडीच्या मंत्र्याकडून शिवसैनिकांना दुय्यम वागणूक

सांगली: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. परंतू या सरकारमधील घटक पक्षांमधील कुरबुरी अजूनही काही संपता संपेना. महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समितींच्या निवडीमध्ये शिवसैनिकांना दुय्यम वागणूक देत आहे, अशी तक्रार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सांगलीतील शिवसैनिकांनी केली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली.

स्थानिक शासकीय समित्यांवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना योग्य संधी मिळत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ‘राज्यात किमान समान कार्यक्रमानुसार महाविकास आघाडी सरकारचे कामकाज चालते. सरकारमध्ये तीनही पक्षांना स्थान असल्याने जिल्हा पातळीवरील शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांना समान स्थान मिळाले पाहिजे. मात्र, सांगली जिल्ह्यात शासकीय समित्यांच्या निवडींमध्ये शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. याबाबत जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबाबत तक्रारी असतील तर त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जातील. मुख्यमंत्री त्यातून मार्ग काढतील, त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही.’असे आश्वासन दिले.

COMMENTS