मतदान घड्याळाला करा म्हणताच संतापलेल्या शिवसैनिकाने पकडली शिवसेना खासदाराची कॉलर!

मतदान घड्याळाला करा म्हणताच संतापलेल्या शिवसैनिकाने पकडली शिवसेना खासदाराची कॉलर!

मुंबई – आज शिवसैनिक आणि शिवसेनेच्या विद्यमान खासदारांमध्ये राडा झाला असल्याचं पहावयास मिळाले आहे. उस्मानाबादमध्ये मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि शिवसैनिक यांच्यात हा राडा झाला. खासदार रवींद्र गायकवाड यांना एका शिवसैनिकांनी मतदान कुणाला करायचे असे विचारले, यावेळी गायकवाड यांनी “घड्याळाला करा”, असं उत्तर दिलं. त्यामुळे संतप्त झालेला शिवसैनिक थेट खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी गायकवाड आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. एका शिवसैनिकाने खासदार रवींद्र गायकवाड यांची कॉलरही पकडली.

दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गायकवाडांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. यामुळे गायकवाड पक्षावर नाराज आहेत. तिकीट कापल्यामुळे गेले काही दिवस गायकवाड राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांच्या भेटी घेत असल्याचेही समोर आले. यामुळे स्थानिक शिवसैनिक गायकवाडांवर नाराज आहेत. उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मतदान केंद्रावर गेले असता यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना मतदान कोणाला करायचे असा सवाल केला. यावेळी घड्याळाला म्हणताच शिवसैनिक संतापले आणि थेट त्यांची कॉलर पकडली.

COMMENTS