शिवसेना, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, आमदार, खासदार देणार एका महिन्याचं वेतन!

शिवसेना, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, आमदार, खासदार देणार एका महिन्याचं वेतन!

मुंबई – कोरोनामुळे संपूर्ण देशावर मोठं संकट आलं आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मोठा निर्णय घेतला असून आपल्या सर्व आमदारांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. तर सर्व खासदारांच्या एका महिन्याचं वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर खासदार प्रधानमंत्री सहाय्या निधीत आपल्या एक महिन्याचं वेतन देणार, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तर कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत, असं सुभाष देसाईंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शरद पवार यांचं ट्वीट

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून, शेती आणि उद्योगधंद्यावर मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रावादी पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे.राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्रांच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचे एक महिन्यांचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की, सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS