‘या’ माजी आमदाराची शिवसेनेत घरवापसी, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना कडवे आव्हान!

‘या’ माजी आमदाराची शिवसेनेत घरवापसी, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना कडवे आव्हान!

नाशिक – माजी आमदाराने शिवसेनेत घरवापसी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आता कडवे आव्हान उभे झाले आहे. येवला लासलगाव विधानसभेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी , जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. नाशिक स्थानिक स्वराज संस्थेचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे आणि नाशिक विभागीय शिक्षक विधानपरिषदेचे आमदार किशोर दराडे हे येवला येथील स्थानिक रहिवाशी असून हे दोघे दराडे बंधू शिवसेनेचे आमदार आहेत. अशातच आता माजीआमदार कल्याणराव पाटलांनी घरवापसी केल्याने याठकाणी शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आता कडवे आव्हान उभे झाले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान कल्याणराव पाटील हे येवल्याचे माजी आमदार आहेत. या मतदारसंघात ते तब्बल दहा वर्ष आमदार होते. परंतु 2014 मधील विधानसभा निवडणुकीत कल्याणराव पाटील हे येवल्यातून छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र शिवसेनेने तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य संभाजी पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील यांनी नाराज होत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा शिवबंधन हातात बांधलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात छगन भुजबळ यांच्यासमोर मोठं आव्हान उभ ठाकलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS