स्वबळावर 40 जागा जिंकू शकता, तर मग युतीसाठी शिवसेनेची पुन्हा पुन्हा मनधरणी कशासाठी ?

स्वबळावर 40 जागा जिंकू शकता, तर मग युतीसाठी शिवसेनेची पुन्हा पुन्हा मनधरणी कशासाठी ?

लातूर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी लातूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना सोबत आली तर ठिक नाही तर स्वबळावर कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. तसंच भाजप स्वबळावर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात लढून 40 जागा जिंकू शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. शिवसेना भाजपसोबत आली नाही तर त्यांनाही आस्मान दाखवू असंही शहा म्हणाले. लातूरमध्ये मख्यमंत्र्यांनीही अशाच अर्थाचं वक्तव्य केलं.

चार दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांनाही मार्गदर्शन केलं होतं. त्यामध्येही त्यांनी खासदारांना स्वबळावर तयारी करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी भाजपकडून काही राज्यात काही सर्व्हे केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यामध्ये भाजप शिवसेना स्वबळावर लढले तर युतीला फटका बसेल पण भाजप 30 च्या आसपास जागा जिंकेल आणि शिवसेना फक्त 5 जागा जिंकेल असंही त्या सर्व्हेमध्ये पुढे आल्याचं म्हटलं होतं. भाजप स्वबळावर 30 किंवा 40 जागा जिंकू शकतो असा भाजप नेत्यांना विश्वास आहे तर मग युतीसाठी भाजप नेते एवढा आटापीटा का करत आहेत. शिवेसना नेते आणि सामनातून रोज भाजपवर जोरदार हल्लाबोल होत असतानाही त्यांना उत्तर का दिलं जात नाही. उलट युती होईल अशीच आशा भाजपच्या नेत्यांना लागली आहे. याचाच अर्थ युतीसाठी भाजप अगतीक आहे. युती झाली नाही तर मोठा फटका पक्षाला बसू शकतो याची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच चौकीदार चोर आहे असं म्हणूनही शिवेसनेला उघडपणे उत्तर देण्याची हिम्मत भाजपचे नेते करताना दिसत नाहीत.

वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणून शिवसेनेला युती करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न भाजपनं केला. मात्र शिवसेना त्याला बळी पडत नसल्यामुळं आता भाजप नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्याचाच प्रयत्य आजच्या लातूरच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीत आला. मुख्यमंत्री आणि अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर तयारी करण्याचे आदेश दिले आहे. दुसरीकडे नारायण राणे यांचा भाजपच्या केंद्रीय जाहीरनामा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही घटना हेही भाजपचा शिवसेनेवर दबावाचा भाग असू शकतो. आता शिवसेना याला तरी बधते का ते पहावं लागेल. शिवसेना यावर काय उत्तर देते ते पहावं लागेल.

इथून पुढेही भाजप शिवेसनाला शेवटपर्यंत चुचकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे स्बळाची तयारी करत असताना भाजप शेवटपर्यंत शिवसेनेला गोंजारण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना त्याला फारशी भिक न घालता स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेना किती जागा जिंकते यापेक्षा भाजपला हरवणे हेच शिवसेनेचं टार्गेट असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजपने कितीही प्रयत्न केले तर शिवेसना स्बळाच्या ना-यावर शेवटपर्य़ंत कायम राहण्याची शक्यता आहे.

COMMENTS