युतीत ठिणगी, शिवसेनेचं आरेला कारे, तर मुख्यमंत्री म्हणतात नाणार नाही जाणार !

युतीत ठिणगी, शिवसेनेचं आरेला कारे, तर मुख्यमंत्री म्हणतात नाणार नाही जाणार !

मुंबई – अनेक दिवसांपासून युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांकडून मात्र युती होणार असल्याचा दावा केला जात आहे. अशातच सध्या अशा काही घडामोडी होत आहेत त्यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये युती होणार नसल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिंधुदुर्ग येथे महाजनादेश यात्रा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्या सकारात्मक वक्तव्य केलं आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच आज मी कोणता निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार असे संकतेही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या वक्तव्यावरुन आरेवरुन कारे करणाऱ्या आणि नाणारचं जे झालं तेच आरेचंदेखील होईल, असं म्हणत मेट्रोच्या कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं म्हणत होतो, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उल्लेख न करता शिवसेनेला इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान काहींनी ‘आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवाय’, असा मजूकर लिहिलेले फलक दाखवले. याच फलकांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरीबद्दल पुन्हा चर्चा होऊ शकते, असं विधान केलं.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करताना शिवसेनेनं नाणारचा मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेनं नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यामुळेच हा प्रकल्प नाणारमधून रद्द करण्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीआधी आरेतील मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा तापला आहे. शिवसेनेनं मेट्रो कारशेडविरोधात दंड थोपटले आहेत. नाणारचं जे झालं, तेच आरेचं होणार, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारशेडविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट नाणार प्रकल्पाला गती देण्याचा मानस व्यक्त केल्यानं शिवसेना-भाजपामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

अशातच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले
नारायण राणे यांनी कणकवलीत मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत केलं. एवढच नाही तर आपण भाजपात जाणार हे निश्चित झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपले पूत्र आमदार नितेश राणे हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपमधून लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीवरुन शिवसेना-भाजपमधील युती तुटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS