शिवसेना-भाजपचं ठरलं, आजपासून जागावाटपाची चर्चा!

शिवसेना-भाजपचं ठरलं, आजपासून जागावाटपाची चर्चा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे आता पक्क झालं असल्याचं दिसत आहे. येत्या पाच दिवसांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण होणार असून आजपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटप चर्चेला सुरुवात होणार आहे. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांच्यासह इतर नेते चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या दोन नेत्यांवर चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात 288 जागांवर महायुतीचे उमेदवार हाच आमचा फॉर्म्युला असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान 2014 मधील विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न या पक्षांसमोर आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याला विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS