शिवसेनेची विधानसभेला स्वबळाकडे वाटचाल ?

शिवसेनेची विधानसभेला स्वबळाकडे वाटचाल ?

मुंबई – नाही नाही म्हणत लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसनेत युती झाली. त्याचवेळी विधानसभेचंही ठरलं असं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री पदाची वाटणी आणि जागांची वाटणीही ठरल्याचं सांगितलं जातंय. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडींकडे पाहता शिवसेना विधानसभेसाठी स्वबळावर तर तयारी करत नाही ना अशी शंका येतीय. कदाचित दोन्ही पक्षाच्या सामंजस्यानेही ही युती तुटु शकते आणि निवडणुकीनंतर पुन्हा ते एकत्र येऊ शकतात.

दोन्ही पक्ष अनेक मतदारसंघात एकमेकांकडे जागा असलेल्या ठिकाणीही उमेदवार शोधत आहेत. तसंच नवी समिकरणेही जुळवण्याचा प्रय़त्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चु कडू आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीत शिवसेनेनं आपल्याला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती खुद्द बच्चू कडू यांनी दिली आहे. गेली पाच वर्ष बच्चू कडू सरकारच्या विरोधात लढत आहेत. मात्र त्यांचा राग हा भाजपवर जास्त आहे. त्यामुळेच युती तुटलीच तर विदर्भात प्रहारची साथ असवी असंही यामागे गणित असल्याचं बोललं जातंय. तसंच काँग्रेससोबत राहून फारसा फायदा होणार नाही याची जाणिव बच्चु कडू यांना आहे. त्यामुळेच ते शिवसेनेसोबत जाऊ शकतात असं बोललं जातंय.

आता शिवसेना विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. विम्याच्या प्रश्नावरुन शेतकरी वर्गात नाराजी आहे. मात्र सत्तेत असताना, विमा कंपन्यांची निवड सरकारनेच केली असताना हा मोर्चा काढला जातोय. उद्या वेगळं लढायंचं झालं तर वीम्याचं प्रकरण आपल्यावर शेकू नये आणि विम्याच्या नाराजीवरुन असलेली शेतकरी मते काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी ही काळजी घेत असल्याचं बोलंल जातंय. त्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रात यात्रा काढणार आहेत. शिवसेनेची ही खेळी स्वबळाकडे वाटचाल करणारी आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकमेकांकडे असलेल्या अनेक जागांवर दोन्ही पक्षाकडून काँग्रेस राष्ट्रवादीतले आमदार किंवा नेते फोडले जात आहे. तसा प्रयत्नही दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. दोन्ही काँग्रेसकडे वजनदार उमेदवार राहू नये अशीच काळजी घेतली जात असल्याचं बोललं जातंय. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षात प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे बंडखोरीचा धोका युतीला आहे. त्यामुळेच एकमेकांच्या विचारानेच कदाचित दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतील असंही बोललं जातंय. नेमकं काय होतं ते आता थोड्याच दिवसात कळेल.

COMMENTS