सत्तास्थापनेचा तिढा सुटणार, शरद पवार आणि सोनिया गांधींच्या बैठकीत ठरला ‘हा’ फॉर्म्युला?

सत्तास्थापनेचा तिढा सुटणार, शरद पवार आणि सोनिया गांधींच्या बैठकीत ठरला ‘हा’ फॉर्म्युला?

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत काल सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. परंतु या बैठकीदरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची बातमी ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिली आहे. तसेच या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला देखील ठरला असल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं आहे.

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ?

1) मुख्यमंत्रीपद हे ५ वर्षासाठी शिवसेनेकडेच असणार.

2) संख्याबळानुसार मंत्रीपदाचं वाटप करण्यात येणार.

3) उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह.

4) काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असणार.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार होती. मात्र आज देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांची जयंत आहे. त्यामुळे बहुतांश काँग्रेस नेते तिकडे व्यस्त असतील. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. मात्र ही बैठक उद्या होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे नेते उपस्थित असतील. तर काँग्रेसकडूनही केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते बैठकीसाठी हजर असतील,’ अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

सोनिया गांधी शिवसेनेसोबत जाण्यास साशंक आहेत. काँग्रेसच्या आमदारांना सरकारमध्ये असावे, असे वाटते. त्यामुळे हिंदुत्ववादासारखे काही मुद्दे शिवसेनेने दूर ठेवावेत, असा काँग्रेसचा आग्रह आहो. कोणाचे किती मंत्री असावेत, मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेकडेच असावे का? उपमुख्यमंत्री किती असावेत, हे स्पष्ट झाल्यानंतरच काँग्रेस भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS