अमित शाह, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही शिवसेना-भाजप आमनेसामने !

अमित शाह, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही शिवसेना-भाजप आमनेसामने !

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल बंद दाराआड जवळपास दोन तास चर्चा झाली. परंतु या चर्चेचा विधानपरिषदेच्या निवडणुकीवर मात्र काहीही परिणाम झाला असल्याचं दिसत नाही. कारण या निवडणुकीत  शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात लढणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. विधानपरिषदेच्या 4 जागांवर शिवसेना भाजपमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यातील बैठकीचा काहीही परिणाम या निवडणुकीवर झाला नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरमध्ये शिवसेना -भाजपमध्ये थेट लढत होणार असून कोकण पदवीधरची जागा भाजपची असून या ठिकाणी भाजपविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. तर मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेची असून भाजप शिवसेनेविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये सामना रंगणार असल्याचं दिसत आहे. तसेच अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, भाजप मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, 25 जूनला मतदान तर 28 जूनला मतमोजणी आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS