मुंबईत महायुतीला आणखी एका पक्षाचा पाठिंबा !

मुंबईत महायुतीला आणखी एका पक्षाचा पाठिंबा !

मुंबई –  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला होणार आहे. या मतदानाच्या तोंडावर मुंबईत महायुतीला आणखी एका पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. गँगस्टर अरुण गवळीच्या ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. दक्षिण मुंबईत महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत हे आहेत. त्यामुळे याठिकाणी अखिल भारतीय सेनेने सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी, मुलगी गीता गवळी आणि विजय अहीर यांची महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी गीता गवळी यांनी त्यांचा पक्ष हा महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगत आहे. ऑगस्ट 2012 मध्ये त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अरुण गवळी तुरुंगात गेल्यानंतरही त्याच्या पत्नीकडून पक्षबांधणी सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आशा गवळी यांनी शिवसेना भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. अखिल भारतीय सेनेच्या या पाठिंब्यामुळे महायुतीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS