‘त्या’ मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, सामनातून पुन्हा भाजपवर कठोर टीका !

‘त्या’ मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, सामनातून पुन्हा भाजपवर कठोर टीका !

मुंबई – शिवसेनेनं पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात घडत असलेल्या सामूहिक आत्महत्यांचं खापर सामनातून भाजप सरकारवर फोडण्यात आलं आहे. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातही ‘गरिबी’ आणि भूकमारीला कंटाळून आत्महत्या करणा-यांचे आकडे रोज वाढत आहेत. हेच काय तुमचे अच्छे दिन ? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. तसेच काल एका शेतक-याच्या मुलीनं केलेल्या आत्महत्येवरुनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘माझे  शिक्षण थांबल्यास माझ्या भावा-बहिणीचं शिक्षण पूर्ण होईल म्हणून मी आत्महत्या करीत आहे.’ एका शेतकऱ्याच्या मुलीचा हा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे हे सर्व चित्र पाहाता हे राज्य बरे चालले आहे असे कुणी म्हणू शकेल काय ? तसे कुणी म्हणत असेल तर त्यांचे धाडस व त्यांच्या हिंमतबाज छाताडांचे कौतुक करावे लागेल. पंतप्रधान मोदी गरिबांच्या संदर्भात काही करतील या भ्रमातून आता बाहेर पडावे लागेल. विकास दर वाढला म्हणजे काय हे गरिबांना माहीत नाही. गरिबांचे मरण मात्र स्वस्त झाले आहे. 

संपर्क मोहीमेवर टीका

माधुरी दीक्षित, सलमान खान, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींकडे संपर्क मोहीमा राबविणाऱयांचा ‘संपर्क’ गरिबांच्या प्रश्नापासून तुटला आहे.

 

बुलेट ट्रेन प्रकल्पावर टीका

बुलेट ट्रेन, मेट्रो, हायपर सिटीसारखे महागडे व श्रीमंती प्रकल्प गरिबांच्या आत्महत्या रोखू शकत नसतील तर आग लावा तुमच्या त्या श्रीमंती थाटाच्या प्रकल्पाना ! भिंगारे कुटुंबाची ‘शवपेटी’ म्हणून आम्ही त्या बुलेट ट्रेनकडे पाहात आहोत.

विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरिबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे. नव्हे, फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात ती पडू लागली आहे. विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यासाठी अभिनंदन ! पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी, गरीब, मजूर, विद्यार्थी आत्मह्त्या करीत आहेत. त्यांचा आक्रोश आणि किंकाळ्या नागपुरात दडपू नका.  ‘ईश्वरी वरदाना’ची नरकपुरी झाली आहे.

COMMENTS