शिवसेनेने 235 वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला – विखे पाटील

शिवसेनेने 235 वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला – विखे पाटील

पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतून बाहेर पडणार नसल्याच्या विधानाचाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांच्यावर बोचरी टीका करताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. लवकरच ते २५० वा इशारा देऊन नवा विक्रम करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर न पडण्याची घोषणा करून शिवसेनेची विक्रमी संधी हुकवली, याचे दुःख असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सनातनसारखी कट्टरवादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपले मधूर संबंध असल्याचे सांगते. कदाचित त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करायला राज्य सरकार तयार नाही, असा आरोप करून सरसंघचालक मोहन भागवत यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी नेमके काय संबंध आहेत; ते जाहीर करण्याचे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. सनातनचे डॉ. जयंत आठवले यांनी अनेकदा लोकांना नक्षलवादी, दहशतवादी बनण्याचे आवाहन केले आहे. राजकीय नेत्यांना ठार मारण्याची आणि राजकीय व्यवस्था उलथवून लावण्याची भाषा वापरली आहे. यासंदर्भातील त्यांची चिथावणीखोर विधाने त्यांचेच मुखपत्र सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाली आहेत. हा एक ठोस पुरावा असून, पुरोगामी विचारवंतांप्रमाणेच या पुराव्यांच्या आधारे पोलीस डॉ. जयंत आठवले यांना अटक करणार का? असा खडा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

COMMENTS

Bitnami