शिवसेना नेत्याकडून भाजप बंडखोर उमेदवाराचा प्रचार

शिवसेना नेत्याकडून भाजप बंडखोर उमेदवाराचा प्रचार

बीड : राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र अशातच आता शिवसेना नेत्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये शिवसेनेचा नेता चक्क भाजपच्या बंडखोर उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचं दिसत आहे.
महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे नेते व माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक उमेदवार रमेश पोकळे यांना विजयी करा असं आवाहन केल्यामुळे महाविकास आघाडीची पदवीधर निवडणुकीत एकवाक्यता नसल्याने दिसून येत आहे. ही क्लिप प्रचंड व्हायरल होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
नरेंद्र पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. तसंच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चादेखील सुरू आहे. यातच ही क्लिप समोर आल्याने राष्ट्रवादीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
‘मराठवाड्यातील उमेदवार रमेश पोकळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून अनेक लोकांची कर्ज प्रकरणे करून दिली आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी या रमेश पोकळे या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं,’ असे आवाहन माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केले आहे. यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून येत्या तीन तारखेला होणाऱ्या पदवीधर विधानसभा मतदारसंघातील निकालावर याचे परिणाम दिसून येतील का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

COMMENTS