तटकरेंच्या कन्येविरोधात शिवसेनेचा मुंबईतील आयात उमेदवार ?

तटकरेंच्या कन्येविरोधात शिवसेनेचा मुंबईतील आयात उमेदवार ?

अलिबाग – श्रीवर्धन मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचं पोमपिच. तटकरे हे गेल्यावेळी विधान परिषदेवर निवडणू गेले त्यामुळे 2014 मध्ये त्यांचे पुतणे अवधूत तटकरे आमदार झाले होते. मात्र यावेळी अवधूत आणि सुनिल तटकरे यांच्यात मतभेद झाले आणि अवधूत यांनी थेट हातात शिवबंधन बांधले. श्रीवर्धनच्या जागेवरुन तटकरे यांच्या कन्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळेच अवधूत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तेच शिवसनेचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. आता मात्र शिवसेनेकडून दुसरचं नाव पुढं केलं जातंय. शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे नाव निश्चित मानलं जात आहे . त्यामुळे यावेळी श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे विरुद्ध विनोद घोसाळकर असा सामना पाहायला मिळणार आहे .  घोसाळकर आज मतदार संघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

विनोद घोसाळकर हे म्हाडाचे सभापती आहेत. 1999 मध्ये त्यांनी माणगाव मतदार संघातून सुनील तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती  तेंव्हा ते पराभूत झाले होते . नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मतदार संघातून 37 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेतील अनेक इच्छुकांनी नांगी टाकली आहे. शिवाय पक्षांतर्गत लाथाळ्यादेखील सुरू आहेत. परिणामी श्रीवर्धनचा किल्ला लढवण्याची जबाबदारी घोसाळकर यांच्यावर येऊन पडली आहे.

दुसरीकडे विनोद घोसाळकर यांना पक्षाने श्रीवर्धनमधून लढण्याचे आदेश दिले असतील तर मुंबईतील दहिसर हा मतदारसंघ भाजपला सोडल्यात जमा आहे अशी चर्चा आहे. दहिसरमधून गेल्यावेळी भाजपच्या मनिषा चौधरी जिंकल्या होत्या. मात्र मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे द्यावा अशी मागणी पक्षाची होती. विनोद घोसाळकर दहिसरमधून निवडणूक लढवण्याच इच्छुक होते.

COMMENTS