सोलापुरात दोन मंत्र्यांमध्ये चुरस, बार्शीत राष्ट्रवादीने खाते उघडले !

सोलापुरात दोन मंत्र्यांमध्ये चुरस, बार्शीत राष्ट्रवादीने खाते उघडले !

सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण भाजपचे दोन मंत्री एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात सामना होतो आहे. सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल तयार करुन या निवडणुकीत रणशिंग फुंकले आहेत. तर सर्वपक्षीय पॅनलमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आपले नशीब अजमावत आहेत. या सर्वपक्षीय पॅनलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात महत्वाची बाजार समिती म्हणून गणल्या जाणा-या बार्शी कृषी उत्पन्न समितीचाही निकाल आज लागणार आहे. त्याची मतमोजणी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसनं खातं उघडलं आहे. हमाल तोलाई गटातून राष्ट्रवादीचा उमेदवार 83 मतांनी विजयी झाला आहे. सध्या 8 ठिकाणी भाजच्या राजेंद्र राऊत यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीच्या दिलीप सोपल पॅनलचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. अगदी गावागावत जाऊन दोन्ही नेत्यांची प्रचाराची राळ उठवली होती. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS