राज्यभरातील सरकारी कामकाज 3 दिवस ठप्प राहणार !

राज्यभरातील सरकारी कामकाज 3 दिवस ठप्प राहणार !

मुंबई – राज्यातील सरकारी कामकाज तीन दिवस ठप्प राहणार आहे. राज्यातील सर्वच सरकारी कर्मचा-यांनी राज्य सरकारविरोधात तीन दिवस राज्यव्यापी संप पुकारला आहे. 7 ऑगस्टपासून या कर्मचा-यांनी संप पुकारला असून केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळालेले नसल्यामुळे हे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सातवा वेतनाकडे सरकार अक्षम्य चालढकल करत असल्याचा आरोप या कर्मचा-यांनी केला आहे.

दरम्यान सुमारे दीड लाख अधिकारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मुख्य मागणीबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण व दमबाजी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही केली जात आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी संपात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. सणासुदीचे दिवस असताना सातव्या वेतन आयोगामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार होती. परंतु गणेशोत्सव जवळ आला असतानाही अद्याप हा आयोग लागू झालेला नाही. हा आयोग गणेशोत्सवाच्या किंवा दिवाळीच्या तोंडावर लागू होईल, असे आश्वासन सरकारने यापूर्वी दिले आहे. मात्र हे आश्वासन ही केवळ धूळफेक असल्याचा गंभीर आरोप अधिकारी महासंघाने केला आहे. या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ राज्‍यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी ७ ते ९ ऑगस्‍ट या तीन दिवसांच्या काळात संपावर जाणार आहेत.

COMMENTS