धनंजय मुंडेंची नाही तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

धनंजय मुंडेंची नाही तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही आता बदल होणे अपेक्षित आहे. जयंत पाटील मंत्री झाल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक व अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे वर्ग होईल असा प्रश्न उपस्थित केला जात होता, त्यावर आता उत्तर निश्चित झाले असल्याचे समजते.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील माजी मंत्री व राष्ट्रवादी व शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान समजले जाणारे शशिकांत शिंदे यांची आता प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. शशिकांत शिंदे हे पक्ष स्थापनेपासूनचे सदस्य असून पवारांचे अत्यंत निष्ठावान व निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचा शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्याकडून अवघ्या सहा हजार मतांनी पराभव झाला होता. तत्पूर्वी सलग दोन टर्म त्यांनी कोरेगाव चे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर 2009 ते 14 च्या आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून कामही केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये पक्ष संघटन मजबूत ठेवण्यामध्ये शिंदेंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सेना – राष्ट्रवादी – काँग्रेस अशी सत्ता स्थापन केली. त्यामुळे विधानपरिषदेतही तिन्ही पक्षांच्या जागा वाढणार आहेत. त्यामध्ये शशिकांत शिंदे यांची वर्णी विधानपरिषदेतही लागणार असल्याचे समजते. महाविकास आघाडी चा मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्याही नावाची चर्चा काही माध्यमांनी रंगवली होती, परंतु ठाकरे सरकारमध्ये मुंडेंकडे जबाबदार मंत्री म्हणून पाहिले जाते. त्यानंतर आता शिंदे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी समोर आल्याने ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी शशिकांत शिंदेंचीच वर्णी लागणार अशी चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

COMMENTS