शिवसेनेसह विरोधकांसमोर सरकार अखेर झुकलं, मेस्मा कायद्याला स्थिगिती !

शिवसेनेसह विरोधकांसमोर सरकार अखेर झुकलं, मेस्मा कायद्याला स्थिगिती !

मुंबई – शिवसेनेसह विरोधकांसमोर सरकार अखेर झुकलं असून अंगणवाडी सेविकांवर लागवण्यात आलेल्या मेस्मा कायद्याला स्थिगिती देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित केला असल्याची घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता हा कायदा मागे घेण्यात आला असल्यामुळे हे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण आहे असं विरोधक म्हणत आहे.

मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीवरुन काल विधानसभेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. विधानसभेत आक्रमक झालेले शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंडही पळवला होता. या प्रकरणावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. तसेच अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या मेस्मा कायद्याला सरकारकडून स्थगिती देणे म्हणजे हा विरोधकांनी आणलेल्या दबावाचा विजय असून राज्य सरकारला हे उशिरा आलेले शहाणपण असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान अंगणवाडी सेविकांना हा कायदा लागू करण्याबाबत महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका ठाम होती. परंतु विरोधकांचा वाढता विरोध आणि सरकारमधील मीत्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं याला कडाडून विरोध केला असल्यामुळे हा कायदा मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS