शिवसेना राणेंना सोडणार नाही, कणकवलीतील निर्धार मेळाव्यात सुभाष देसाईंची नारायण राणेंवर जोरदार टीका !

शिवसेना राणेंना सोडणार नाही, कणकवलीतील निर्धार मेळाव्यात सुभाष देसाईंची नारायण राणेंवर जोरदार टीका !

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दगडाला शेंदूर लावला म्हणून देवपण येत नाही. बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाची त्याने बूज राखली नाही. साहेबांना त्याने खुप त्रास दिला. अशा माणसाला शिवसेना कसं माफ करणार ? अशी जोरदार टीका सुभाष देसाई यांनी केली आहे. तसेच आज त्याची अवस्था ना घर का न घाट का अशी झाली आहे. त्याची मुलं त्याच्यासोबत नाहीत. पोरगा अजून काँग्रेसमध्येच आहे. एका आमदारकीसाठी आपल्या बापाला साथ न देणारा पोरगा ज्या घरात आहे, त्या घरावर कोण विश्वास ठेवणार ? असंही देसाई यांनी म्हटलं आहे. कणकवलीमध्ये आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेवर दुटप्पी असल्याचा आरोप करतो, आम्ही नाही तर राणे दुटप्पी आहे. जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला कुणी पाठिंबा दिला ? हेच काँग्रेसमध्ये मंत्री होते त्यांनीच सांगितलं की हा प्रकल्प झालाच पाहिजे. त्यावेळी केलेल्या गोळीबारात तरबेज नावाचा मुस्लिम मच्छीमार ठार झाला. हा हैदोस घालणारा म्हणतोय की मी नाणारला विरोध करणार ! तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार ?, मी निवडणूक आयोगाला सांगणार आहे की  राणेंच्या पक्षाचं नाव दुरुस्त करून स्वार्थाभिमान पक्ष करा अशी टीकाही देसाई यांनी केली आहे.

भाजपने त्यांना बरोबर लटकवून ठेवलंय. भाजपला माहीत आहे की ज्यादिवशी राणेंना मंत्रिमंडळात घेऊ त्यादिवशी सेना मंत्रिमंडळाला लाथ मारेल. म्हणून भाजपची हिम्मत होत नाही त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची. आता पार्सल दिल्लीला चाललंय. या माणसाला माहिती आहे की दिल्लीला पाठवून माझा काटा काढणार. मग स्वार्थ ही नाही आणि अभिमानही नाही. म्हणून त्यांची घालमेल सुरु आहे. शेवटी यांच्या वाट्याला हेच येणार. ज्यांनी शिवसेनेला दगा दिला त्यांची अवस्था काय आहे?, भुजबळ यांची तब्येत चांगली नसल्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. सहानुभूती आहे. पण आयुष्याच्या शेवटी कारकिर्दीच्या शेवटी हे असं व्हावं ? अवहेलना !  भरपूर पैसे कमावले असतील पण उपयोग काय त्याचा ? तो पैसा तुला तुरुंगाच्या बाहेर काढू शकला नाही. ज्याने मुलासारखं प्रेम केलं त्या नेत्याला दगा दिला. आणि दुसऱ्या नेत्याचा हात धरला. ते शरद पवारही तुला वाचवू शकले नाहीत. जो तो आपआपल्या कर्माने जगत-मरत असतो. आपला मार्ग सरळ आहे.

शिवसेनेने राणेंना दोन वेळा धूळ चारलीय. एकदा सिंधुदुर्गात आणि दुसऱ्यांदा वांद्र्यात साफ चेंदामेंदा केला. गुर्मी जात नाही त्यांची. हिरण्यकश्यपूची कथा त्यांनी डोळ्यापुढे ठेवावी आणि माजलेल्या माणसाचा शेवट काय होतो याचा बोध घ्यावा. महाराष्ट्रात हा कुठेही असो शिवसेना राणेंना सोडणार नाही. तो जिथे असेल तिथे त्याचा चेंदा मेंदा करायला शिवसेना समर्थ आहे अशी टीकाही देसाई यांनी केली आहे.

COMMENTS