अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरसाठी महत्त्वपूर्ण निर्णय !

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरसाठी महत्त्वपूर्ण निर्णय !

चंद्रपूर – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय परिसरात राज्‍य शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग, जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर आणि टाटा ट्रस्‍ट यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाने आज घेतला. राज्‍याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर येथे कॅन्‍सर हॉस्‍पीटल अर्थात कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान टाटा ट्रस्‍टच्‍या मदतीने चंद्रपूर येथे 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍यात यावे यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्‍या वर्षभरापासुन टाटा ट्रस्‍टकडे पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात टाटा ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यांसमवेत अनेक बैठकीसुध्‍दा त्‍यांनी घेतल्‍या. टाटा ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर येथे सदर रूग्‍णालय उभारण्‍यासंदर्भात होकार मिळाल्‍यानंतर आज झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा विषय चर्चेत आला असता याबाबतच्‍या प्रस्‍तावाला मंत्रीमंडळाने मान्‍यता प्रदान केली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयाची लोकसंख्‍या सुमारे 23 लक्ष असुन त्‍यात दरवर्षी 0.6 टक्‍क्‍याने वाढ होत आहे. सदर जिल्‍हयात प्रदुषणाची तीव्रता अधिक आहे. त्‍यामुळे कर्करोगाने ग्रस्‍त रूग्‍णांचे प्रमाणसुध्‍दा जिल्‍हयात मोठया प्रमाणावर आहे. चंद्रपूर व नजिकच्‍या जिल्‍हयातील कर्करोगग्रस्‍त रूग्‍णांना सर्वंकष व अत्‍याधुनिक कर्करोग उपचाराच्‍या सोयीसुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी राज्‍य शासनासह, कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्‍ये अग्रगण्‍य व नामांकित असलेल्‍या टाटा ट्रस्‍ट तसेच जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान चंद्रपूर यांच्‍या माध्‍यमातुन खाजगी भागीदारी तत्‍वावर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍याचा प्रस्‍ताव विभागाने सादर केला व या प्रस्‍तावाला आज मंजूरी देण्‍यात आली.

सदर 100 खाटांचे कर्करोग रूग्‍णालय उभारण्‍यासाठी व त्‍याचे संचलन करण्‍यासाठी विशेष कृती समितीची तसेच चांदा कर्करोग केअर प्रतिष्‍ठान या नावाची एक संस्‍था स्‍थापना करण्‍यात येणार आहे. सदर रूग्‍ण्‍णालय उभारणीसाठी या प्रकल्‍पामध्‍ये भागीदार असणा-या तीनही संस्‍थांचे आर्थिक दायित्‍व असणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर या संस्‍थेची उभारणी करण्‍यात येणा-या परिसरातील विभागाच्‍या अखत्‍यारित 50 एकर जमिनीपैकी सुमारे 10 एकर जागा सदर प्रकल्‍पासाठी निर्माण करण्‍यात येणा-या संस्‍थेस 30 वर्षासाठी नाममात्र दराने भुईभाडयाने देण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. या कर्करोग रूग्‍णालयातील रूग्‍णसेवा शासकीय वैद्यकीय रूग्‍णालयातील विभागात उपलब्‍ध करून देण्‍यात येतील त्‍याचप्रमाणे शासकीय वैद्यकिय रूग्‍णालय चंद्रपूर येथील रूग्‍णांनाही कर्करोग उपचारांच्‍या सुविधा आवश्‍यक असल्‍यास सदर कर्करोग रूग्‍णालयात त्‍यांना उपचार सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात येतील. या रूग्‍णालयासाठी सुमारे 113 कोटी रूपयांचे सहाय्य चंद्रपूर जिल्‍हा खनिज प्रतिष्‍ठान यांच्‍याकडून मिळणार असुन त्‍यापैकी 76 कोटी रूपये कर्करोग रूग्‍णालय उभारणी व 37 कोटी रूपये सदर रूग्‍णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी यांच्‍या निवासस्‍थान बांधकामासाठी प्राप्‍त होणार आहे. तसेच सदर रूग्‍णालय कार्यान्‍वीत झाल्‍यानंतर व्‍यवहार्य दृष्‍टीने चालविण्‍याइतपत सक्षम होईपर्यंत प्रथम 7 वर्ष प्रतीवर्षी सुमारे 20 कोटी रूपयांचे अनुदान राज्‍य शासनातर्फे याविषयी स्‍थापन करण्‍यात येणा-या कंपनीला उपलब्‍ध करून देण्‍याबाबत राज्‍य शासनाच्‍या आर्थिक दायित्‍वास सुध्‍दा मान्‍यता प्रदान करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या सर्वांगिण विकासासाच्‍या दृष्‍टीने विविध महत्‍वपूर्ण निर्णय घेणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरात उभारण्‍यात येणारे सदर कर्करोग रूग्‍णालय त्‍यांच्‍या विकासकामांच्‍या दिर्घ मालिकेतील मैलाचा दगड ठरणार आहे. सदर कर्करोग रूग्‍णालय एका वर्षात बांधून पूर्ण करत जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍यात येणार असुन या माध्‍यमातुन जिल्‍हयातील नागरिकांना आरोग्‍याची मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

 

COMMENTS