सुप्रिया सुळेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट, निवडणुकीतील मदतीबाबत म्हणाल्या …

सुप्रिया सुळेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट, निवडणुकीतील मदतीबाबत म्हणाल्या …

पुणे – बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांची  पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट होती, असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी चांगलं मताधिक्य सुळेेंना मिळवून दिलं आहे. याबद्दल सुळेंनी या दोन्ही नेत्यांचे आभार मानले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप आभार. या पुढील काळातही तुमची साथ अशीच राहू द्या, असं सुप्रिया सुळेंनी यावेळी हर्षवर्धन पाटलांना म्हटलं आहे.

शरद पवारांच्या पुढाकारानंतर हर्षवर्धन पाटलांनी केली मदत !

सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना साद घातली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना लोकसभा नवडणुकीत मदत केली.
२०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीने पुरंदरमध्ये संजय जगताप आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा केलेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे देखील खूप प्रयत्नांनी निवडून आले होते. हे तीनही मतदारसंघ बारामतीत येत असल्याने तिथून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या मताधिक्यासाठी पाटील यांची गरज होती. दुसरीकडे भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले होते. त्यात कुल कमळावर लढणार असल्याने त्यांना खड़कवासल्यातून फायदा होण्याची चिन्हे होती. त्यांचे बारामती तालुक्यात नातेसंबंध असल्यामुळे तिथेही सुळे यांना मतांसाठी संघर्ष करावा लागला. अशावेळी पुरंदर, भोर आणि इंदापूरची मते सुळे यांच्याकरीता महत्वाची ठरणार होती. म्हणून मागील निवडणुकीत दुखावलेल्या पाटील यांची समजूत काढण्यासाठी स्वत: शरदपवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली.
याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले.

COMMENTS