प्रत्येक गोष्टीकडे राजकीय हेतूने पाहू नका – सुनील तटकरे

प्रत्येक गोष्टीकडे राजकीय हेतूने पाहू नका – सुनील तटकरे

रोहा – सर्वांना सोबत घेऊन मी माझी राजकीय वाटचाल करत आहे. आमदार अथवा मंत्री असो वा नसो; पण मी अविरतपणे जनतेची कामे केली आहेत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी प्रत्येक गोष्ट राजकीय हेतूने पाहू नका, असे विरोधकांना सुनावले आहे.

रोहा-अष्टमी नगर परिषद हद्दीतील शहर विकास आराखडयातील आरक्षण क्रमांक 29 च्या भूखंडावर विकसित केलेल्या पार्किंगचे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाहनतळ असे नामकरण करण्यात आले. या वाहनतळाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार तटकरे पुढे म्हणाले की, कुंडलिका संवर्धन, मल्टीप्लेक्स, तसेच वाढीव पाणीपुरवठयाचे काम रोहा नगरपालिकेकडून चालू आहे. रोह्यात ज्येष्ठ पत्रकार दिलीप राजे यांच्या नावाने वाहनतळ उभारण्यात आले आहे. तर आज चांगल्या पद्धतीचे वाहनतळ रोहा-मुरूड मार्गावर उभारण्यात आले आहे. लोकांच्या मनात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांची प्रेरणा कायम राहावी, यासाठी या वाहनतळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. कोकणातील आरक्षणातून विकसित झालेली, भव्य वाहनतळ उभारणारी क वर्गातील रोहा नगरपालिका ही पहिली ठरली असल्याचेही आमदार तटकरे यांनी या वेळी नमूद केले.

या वेळी माजी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम खान, आमदार अनिकेत तटकरे, रोहा पंचायत समितीच्या सभापती राजश्री पोकळे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे रोहा तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादीच्या महिला रायगड जिल्हाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजयराव मोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, अलिभाई रोगे, अब्दुल रहमान चोगले, नसीम महाडकर, अब्बास अनवरे, अलिम मुमैरे, आदी उपस्थित होते.

COMMENTS