उस्मानाबाद – सुरेश पाटील यांचा ऑटो रिक्षा कुणाला धडक देणार !

उस्मानाबाद – सुरेश पाटील यांचा ऑटो रिक्षा कुणाला धडक देणार !

उस्मानाबाद – विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. कॉर्नर सभा, बैठका, फेऱ्या यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एस पी शुगर अध्यक्ष सुरेश पाटीलही मैदानात उतरले आहेत. अपक्ष म्हणून लढत देत असलेल्या पाटील यांचे चिन्ह ऑटोरिक्षा असून आता त्यांचीही रिक्षा कोणाला धडक देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुळात सुरेश पाटील हे कसबे तडवळे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते. जिल्हा परिषद मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. त्याच वेळी ते विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याने उमेदवारी त्यांना मिळेल अशी चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीकडूनही त्यांना डावलले. सध्या सुरेश पाटील यांच्याकडे कसबे तडवळे येथील ग्रामपंचायत आहे. चार ते पाच हजार मतदार त्या गावात आहेत. शिवाय कारखान्याच्या माध्यमातून ढोकी, खमसवाडी, कोंबडवाडी, खामगाव आदी भागात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. आता हे कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभेच्या रिंगणामध्ये किती उपयुक्त ठरणार यावरच त्यांची मदार आहे.

गेल्या अनेक निवडणुका त्यांनी कसबेतडवळे आणि परिसरातील गावात शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळवून दिली होती. मात्र आता स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने या भागातील शिवसेनेची मतदार त्यांच्याकडेच राहणार की शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणार याची उत्सुकता आहे. जसं त्यांच्या उमेदवारीचा फटका शिवसेनेला बसणार तसेच तो राष्ट्रवादीलाही बसू शकतो. कारण या मतदारसंघात राणाजगजितसिंह पाटील यांचे अनेक समर्थक आहेत. यातील काही समर्थक पाटील यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जाते. ते राष्ट्रवादीचे मतदान असल्याने तिथे राष्ट्रवादीलाही फटका बसू शकतो. त्यामुळे सुरेश पाटील त्यांची ऑटोरिक्षा आता कोणाला धडक देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

COMMENTS