तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर, दिवंगत जयललितांच्या जागेवर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पराभूत !

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर, दिवंगत जयललितांच्या जागेवर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पराभूत !

चेन्नई – दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आर के नगर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जयललिता यांच्या मैत्रिण आणि सध्या तरुंगात असलेल्या शशीकला यांचा भाच्चा दिनकरन विजयी झाले आहेत. या निकालामुळे तामिळनाडूचं राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. दिनकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुकच्या उमेदवाराचा ण केला आहे. दिनकरन यांना एकूण 89 हजार 013  मतं मिळाली असून त्यांचा 40 हजार 707 मतांनी विजय झाला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी  मधूसूदन यांना 48  हजार 306 मतं मिळाली आहेत. तसेच डीएमकेच्या मारुथू गणेश यांना 24 हजार 651 मतं पडली आहेत.

या निकालामुळे तामिळनाडूच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा वारसदार कोण ? यावरुन तामिळनाडूमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. जयललिता आजारी असताना त्यांनी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. मात्र जयललितांच्या निधनानंतर त्यांच्या मैत्रिण शशीकला यांनी अण्णा द्रमुकवर ताबा मिळवण्याचा प्रय़त्न केला. अण्णा द्रमुकमधील मोठा गट त्यांच्यासोबत गेला.

त्याचदरम्यान अधिक संपत्तीच्या मुद्यावरुन त्यांना तुरुंगवास झाला. आणि तिथूनच पुन्हा तामिळनाडूचे राजकारण बदलले. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली शशिकला यांना आव्हान देत अण्णा द्रमुकमधील एक गट बाहेर पडला. त्यानंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. शशीकला या तुरुंगात गेल्यापासून त्यांच्या गटाची धुरा हे त्यांचे भाचे दिनकरन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जयललिता यांच्या वारसदार कोण यावरुन तामिळनाडूमध्ये या दोन्ही गटात जारदार संघर्ष सुरू आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या आर के नगर या पोटनिवडणुकीची घोषणा झाली. या निवडणुकीत स्वतः दिनकरन यांनी उडी घेतली. तर सत्ताधारी अण्णा द्रमुख आणि राज्यातली प्रमुख विरोधी पक्ष द्रमुक यांनीही या निवडणुकीत उडी घेतली. संपूर्ण तामिळनाडूचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले होते. जयललितांच्या मतदारसंघात निवडणूक होत असल्यामुळे त्यांचा वारसदार कोण अशाच पद्धतीनं या निवडणुकीकडं पाहिलं जात होतं. अखेर दिनकरन यांनी मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली.

दरम्यान विजयानंतर बोलतना दिनकरन यांनी आपणच जयललिता यांचे खरे वारसदार असल्याचा दावा केला आहे. सध्याचं सरकार हे येत्या 3 महिन्यात कोसळेल असं भाकितही दिनकरन यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तामिळनाडूतील राजकारण अस्थिरतेकडे झुकण्याची शक्यता आहे. तसंच शशिकला यांचा गट पुन्हा प्रबळ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

 

COMMENTS