टेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी

टेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी

मुंबई – गेली अनेक वर्ष रेंगाळलेल्या टेंभुर्णी लातूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम एका महिन्यात सुरू होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मुंबईत मुंबई पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात गडकरी बोलत होते. केंद्रीय मंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी कोणत्या योजना आणि प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि कोणते सुरू होणार आहेत याची माहिती गडकरींनी काल दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी टेंभूर्णी – लातूर या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम एका महिन्यात सुरू होईल असं आश्वासन दिलं.

पुणे सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण होऊन अनेक दिवस झाले. मात्र टेंभुर्णी – लातूर मार्गाचे काम रेंगाळले होते. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढलेली आहे. त्यातच ऊस गाळप हंगामात तर ऊसाचे ट्रक आणि बैलगाड्या यामुळे या मार्गावरील वाहतूक खूपच धीम्या गतीने होते. त्यातच हा मार्गाची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. पुण्याहून लातूरला जाताना टेंभुर्णीपर्यंतचा रस्त्या अत्यंत चांगला आहे. त्यापुढचा प्रवास म्हणज्ये शिक्षाच असा अनुभव प्रवाशांना येतो. मात्र नाईलाज म्हणून प्रवास करावाच लागतो. गडकरींनी दिलेलं आश्वासन पाळलं तर या गैरसोईतून लातूरकर, उस्मानबादकर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागाची सुटका होणार आहे.