ठाण्यात शिंदे – आव्हाड जवळीक वाढली,  लोकसभेला कल्याण, ठाण्यामध्ये सेटिंग होणार ?

ठाण्यात शिंदे – आव्हाड जवळीक वाढली,  लोकसभेला कल्याण, ठाण्यामध्ये सेटिंग होणार ?

ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक रस्तेवाहतूक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं शिवसेनेनं ठाणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. ठाणे, कल्याण, पालघर आणि भिवंडी या चार मतदारसंघाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे आता कामाला लागले आहेत. तसंही ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची जबाबदारी शिंदे यांच्यावर असतेच. पण पहिल्यांदाच लोकसभेच्या मतदारसंघाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिंदे बेरजेच्या राजकारणात माहिर आहेत. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य राजकीय घडामोडी गृहीत धरुन ते कामाला लागेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातूनच शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्याचं बोललं जातंय.

एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक. महापालिका असो किंवा इतर कुठलीही निवडणूक, शिंदे आणि आव्हाड यांच्यातील संघर्ष अनेकवेळा पहायला मिळतो. मात्र आता बदलत्या राजकीय समिकरणानुसार दोघेही जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. उघडपणे दोघांना एकत्र येणं अशक्य आहे. मात्र पडद्याआडून एकमेकांना फायदेशीर होईल अशी भूमिका घेतली जाईल अशी चर्चा आहे. कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे. मात्र तिथे श्रीकांत यांना काहीही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे दक्ष आहेत. त्यामुळेच तिथून राष्ट्रवादीने श्रीकांत यांना फायदा होईल अशी भूमिका घ्यायची आणि त्या बदल्यात ठाणे लोकसभेला राष्ट्रवादीला फायदा होईल अशी शिवसेनेने भूमिका घ्यायची अशी रणनिती असू शकते असा राजकीय कयास आहे.

दुसरीकडे ठाण्यातील एका शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याचीही चर्चा आहे. कदाचित तोच नेता ठाण्यातील भाजपचा लोकसभेसाठी उमेदवार असू शकतो अशीही चर्चा आहे. आव्हाड आणि शिंदे यांचा तो समान विरोधक आहे. त्यामुळे विरोधकच एकच असल्यामुळेही हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवरुनही शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची काही जागांवर आघाडीशी अंतर्गत एडजेस्टमेंट होण्याची शक्याताही वर्तवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून अशा प्रकारची अंतर्गत आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यातून आघाडीला फायदा होऊ शकतो आणि शिवसेनेलाही फायदा होऊ शकतो. यापुढे कशा प्रकारे राजकीय घडामोडी घडतात त्यावर रणनितीमध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे.

दुसरीकडे भिवंडीमध्ये एका भाजप आमदाराला राष्ट्रवादी प्रवेश देऊन त्यांना भिवंडी लोकसभेतून लढवण्याचेही प्रयत्न सुरू आहे. त्याच आमदाराला शिवसेनेमध्येही खेचण्याचे प्रयत्न आहेत. त्या आमदारांनी शिवेसना किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास संबंधित पक्षाचे ते लोकसभेचे उमेदवार ठरू शकतात.  भिवंडीतून तिरंगी लढत झाल्यास त्याचा फटका भाजपच्या विद्यमान खासदारांना होण्याची शक्यता आहे. तर कमी ताकद असलेल्या पालघरमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला अंतर्गत मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी कुजबूत राजकीय वर्तुळात सुरू आहे. येत्या 8 महिन्यामध्ये राजकारण कसं बदलतं त्यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र सध्यातरी अशी राजकीय स्थिती आहे.

COMMENTS