भाजपचे दोन नेते शिवसेनेच्या तंबूत

भाजपचे दोन नेते शिवसेनेच्या तंबूत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षातील नेत्यांचे पक्षांतराला जोर आला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने भाजपचे दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागुल हे दोघेही पक्ष नेतृत्वावर नाराज असून ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी वसंत गिते यांन मिसळ पार्टीचे आयोजन करून सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे. गिते आणि बागूल यांना रावसाहेब दानवे यांच्या कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरून हटवण्यात येऊन पक्षात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे राजकीय वजन वाढविण्यात आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हे दोघे नाराज होते. गिते व बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली.

संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेऊन गिते व बागुल यांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यांनतर सायंकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन हाती बांधणार आहेत, अशी चर्चा आहे. गिते व बागुल यांच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

COMMENTS